वेबसाईटबद्दल थोडेसे

जागृत नागरिक महासंघाच्या नूतन संकेतस्थळ (वेबसाईट)चे अण्णा हजारे यांच्या हस्ते उद्घाटन
पिंपरी (दिनांक : ०४ मे २०२३)
“कोणत्याही प्रसिद्धीचा लाभ किंवा फायदा न घेता माहिती अधिकार कायद्याचा शंभर टक्के सकारात्मक वापर करून फक्त जनतेची सेवा करणारी संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे जागृत नागरिक महासंघ होय!” असे गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी येथे शनिवार, दिनांक ०३ मे २०२३ रोजी काढले. जागृत नागरिक महासंघ (माहिती अधिकार प्रचार प्रसार समिती) च्या ‘एचटीटीपी://जेएनएम-आरटीआय.इन’ (https://jnm-rti.in) या नूतन संकेतस्थळा (वेबसाईट) चे उद्घाटन अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जागृत नागरिक महासंघाचे अध्यक्ष नितीन यादव, सचिव उमेश सणस, सदस्य दीपक नाईक, मच्छिंद्र कदम आणि दत्तात्रय देवकर यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी अण्णा हजारे पुढे म्हणाले की, “महाराष्ट्रातून माझ्याकडे शेकडो संस्था येत असतात; पण कोणताही वैयक्तिक लाभ अथवा फायदा न घेता फक्त जनतेची सेवा हा महासंघाचा सेवाभाव मला खूपच आवडला. शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, त्याग करण्याची तयारी आणि अपमान पचवण्याची शक्ती असणाऱ्या अशाच सभासदांची संस्थेसाठी निवड करा. अनेक लोक फक्त स्वतःची प्रसिद्धी, फोटो आणि वर्तमानपत्रातील बातम्या यासाठीच काम करत असतात; पण निष्कलंक मनाने कोणतीही अपेक्षा न ठेवता तसेच निष्काम मनाने आपण सेवा करत आहात. मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. फक्त नाक दाबून, डोळे बंद करून, मंदिरात बसून ईश्वरसेवा होत नाही. माहिती अधिकार माध्यमातून तुम्ही जे काही करत आहात तीच खरी ईश्वरसेवा आहे आणि मला खात्री वाटते की, तुमच्या हातून हे सर्व घडेल व एक दिवस ही संस्था फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात, प्रत्येक राज्यात नावाजली जाईल, अशी मला खात्री नाही तर विश्वास वाटतो!”

यावेळी आपल्या समाजसेवेतील कारकिर्दीच्या आठवणींना उजाळा देताना भारत सरकारला माहिती अधिकाराशी संबंधित दहा कायदे करण्यासाठी भाग पाडले; तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर माहिती अधिकार कायद्यासाठी जनजागृती केली. वयाच्या पंधराव्या वर्षी समाजसेवेचे काम चालू केले ते आज वयाच्या ८६व्या वर्षापर्यंत अखंडपणे चालू आहे. ३३ जिल्हे २५२ तालुके या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संघटन तयार केले. त्यामुळे सरकारवर या संघटनेचा नैतिक दबाव निर्माण झाला असून त्यातून अनेक लोककल्याणकारी योजना कार्यान्वित होण्यास मदत झाली, अशीही माहिती अण्णा हजारे यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

×